एस.एस.जी.एम मध्ये पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन

एस.एस.जी.एम मध्ये पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन
कोपरगाव दि.१४: रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स व संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी अंतर्गत ‘बुद्धिमत्ता घटकावर सखोल मार्गदर्शन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मार्गदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भागवत बैरागी लाभले तर अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले.


सदर प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा.भागवत बैरागी यांनी, “ बुद्धिमापन या घटकाची विविध उदाहरणासह सखोल माहिती देताना विद्यार्थ्यांनी करिअरची निवड, क्षेत्राची आवड आणि स्वतःची क्षमता यांचा विचार करावा. कारण आपला पाया भक्कम असेल, तरच त्यावर मजबूत इमारत उभी राहते. दररोजचा सराव, वेळेचे अचूक नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या माध्यमातून ध्येय गाठणे निश्चितपणे शक्य आहे.” असे स्पष्ट केले.
तर अध्यक्षीय मनोगत प्रसंगी प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “भरती परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कमी वेळेत जास्तीत-जास्त प्रश्न अचूकपणे सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित सराव करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी करिअरचे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. माधव रेवगडे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत करून प्रमुख मार्गदर्शक पाहुण्यांचा परिचय पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीचे चेअरमन श्री. संदीप शिंदे यांनी करून दिला. कार्यक्रमास महाविद्यालयातील ज्युनिअर विभागातील प्राध्यापक तसेच भरतीची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जयश्री शेंडगे व सौ.ज्योती लामखडे यांनी केले, तर आभार ज्युनिअर विभागाचे प्रभारी उपप्राचार्य श्री. रवींद्र हिंगे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.



