कोपरगाव हादरले! शेततळ्यात बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

कोपरगाव हादरले! शेततळ्यात बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद ग्रामपंचायत हद्दीतील गावाच्या सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील दत्तवाडी येथील पाचोरे वस्ती परिसरात बुधवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक रामचंद्र पाचोरे (वय ३३) आणि प्रशांत गीताराम पाचोरे (वय ३४) हे दोघेही शेतातील खरीप पिकांवर फवारणी करण्यासाठी गेले होते. सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या दरम्यान त्यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना प्रशांत पाचोरे यांच्या पत्नीच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पाचोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली असून, या दुर्दैवी घटनेमुळे बहादराबाद परिसरात शोककळा पसरली आहे.
कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद परिसरात एका दुर्दैवी घटनेत तलावात बुडालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. शेतात गेलेल्या पत्नी धनश्री पाचोरे यांनी पती प्रशांत (दीपक) पाचोरे हे दिसत नसल्याने त्यांचा शोध सुरू केला. यावेळी तलावाच्या दिशेने धाव घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
घटनेनंतर दीपक पाचोरे यांना पाण्यातून बाहेर काढून तातडीने शिर्डी येथील साई संस्थान रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, तलावात शोधमोहीम राबवूनही मृतदेह सापडत नसल्याने जेसीबीच्या सहाय्याने शेततळे फोडण्यात आले. त्यानंतर मृत तरुणाचा मृतदेह आढळून आला. शोधकार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाचीही मदत घेण्यात आल्याची माहिती बहादराबादचे माजी सरपंच विक्रम पाचोरे यांनी दिली.
घटनास्थळी तलाठी किशोर गटकळ यांनी धाव घेत पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू केली. या दुर्दैवी घटनेमुळे बहादराबाद, जवळके तसेच सोयगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
दरम्यान मृत प्रशांत गीताराम पाचोरे याचे पश्चात आजी, आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा तर स्व. दीपक पाचोरे याचे पश्चात आई, वडील, एक भाऊ, पाच बहिणी असा परिवार आहे.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर शिर्डी येथील साईबाबा संस्थान, राहाता येथील नगरपरिषद, कोपरगाव येथील नगरपरिषदेच्या अग्निशामक बंब आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले असल्याची माहिती हाती आली आहे. त्याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.




