एस. एस. जी. एम. महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षेची तयारी पूर्ण: १० फेब्रुवारीपासून परीक्षा

एस. एस. जी. एम. महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षेची तयारी पूर्ण: १० फेब्रुवारीपासून परीक्षा
कोपरगाव :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने आयोजित इयत्ता बारावी फेब्रुवारी/मार्च २०२६ बोर्ड परीक्षा कोपरगाव येथील एस. एस. जी. एम. कॉलेज (केंद्र क्रमांक ०२४४) येथे मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा असून या पेपरसाठी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था दोन परीक्षा केंद्रांवर करण्यात आली आहे. ती अनुक्रमे एस. एस. जी. एम. महाविद्यालय, कोपरगाव (मुख्य परीक्षा केंद्र) येथे एकूण ५२ ब्लॉकमध्ये परीक्षा क्रमांक P081973 ते P258974 असलेल्या विद्यार्थ्यांची, तसेच के. बी. पी. माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, कोपरगाव (उपकेंद्र) येथे एकूण १४ ब्लॉकमध्ये परीक्षा क्रमांक P081623 ते P081972 असलेल्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.

परीक्षा केंद्र प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, इंग्रजी विषयाच्या पेपरनंतर येणारे सर्व पुढील विषयांचे लेखी पेपर फक्त एस. एस. जी. एम. कॉलेज (मुख्य परीक्षा केंद्र) येथेच होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी याची विशेष नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी आपल्या हॉल तिकीटवरील परीक्षा क्रमांकानुसार निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सदर परीक्षेसाठी रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. श्री. भगीरथकाका शिंदे, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. माधव सरोदे, उपप्राचार्य, कार्यालयीन अधीक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.





