उत्तम ज्ञान मिळविण्यात विलक्षण आनंद” -प्रा. केशव सखाराम देशमुख

उत्तम ज्ञान मिळविण्यात विलक्षण आनंद” -प्रा. केशव सखाराम देशमुख
कोपरगाव,दि.१३ “यू.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी.सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांनी मोठी झेप घेतली असून, प्रत्येक विद्यार्थ्याने मला काय व्हायचे आहे हा प्रश्न स्वतःला विचारून स्वतःची ओळख शोधली पाहिजे, शिक्षण ही आज पात्रता असून ज्ञान म्हणजे केवळ माहिती नसून ते भविष्यात उपजीविकेचे साधन ठरले पाहिजे. अभिनय, लेखन, गायन, वादन, संपादन, जाहिरात, मानपत्र लेखन, मुलाखत व पाककला यांसारख्या विविध क्षेत्रांत कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील माजी मराठी विभागप्रमुख व प्रसिद्ध प्राध्यापक प्रा. केशव सखाराम देशमुख यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे विद्यार्थी कल्याण मंडळ, वाङ्मय मंडळ तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित त्रिभाषा सूत्र : लेखन कौशल्य विकास कार्यशाळेत बोलत होते.

प्रमुख वक्ते कला व वाणिज्य महाविद्यालय, सात्रळचे हिंदी विभागप्रमुख डॉ. अनंत केदारे म्हणाले की, “भाषा हे मानवी अभिव्यक्तीचे प्रमुख माध्यम असून भाषिक कौशल्यांच्या आधारे जीवन अधिक सुसंस्कृत व समृद्ध करता येते”. प्रमुख वक्त्या कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालय, राहाता येथील इंग्रजी विभागप्रमुख, डॉ. रोहिणी कासार यांनी भाषिक कौशल्यांमध्ये लेखन, वाचन, संभाषण व भाषण यांचे महत्त्व विशद करून नियमित सरावासोबत सातत्यपूर्ण सुधारणा आवश्यक असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी विद्यार्थी-केंद्रित ४१ कौशल्याधारित उपक्रम, नवीन अभ्यासक्रम सुरु करण्याचा मानस व भाषांतराच्या गरजेवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष पवार यांनी केले. सदर कार्यशाळेसाठी प्रा. उज्ज्वला भोर, डॉ.रंजना वर्दे, डॉ. बंडेराव तऱ्हाळ, प्रा. तानसेन रणदिवे, प्रा. महेश दिघे, प्रा. आरती खामकर, प्रा. रूपाली साप्ते,प्रा. सुकेशनी बनसोडे, श्रीमती देशमुख, श्रीमती उमाप, प्रा. मनोज आवारे, प्रा. सुनील काकडे, डॉ. योगेश दाणे, श्री. गणेश जगताप, श्री. सोमनाथ तारडे यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. भागवत देवकाते यांनी केले तर आभार डॉ. माधव यशवंत यांनी मानले.




