आण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोरील महापुरुषांच्या नावाचा फलक पाडल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार

आण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोरील महापुरुषांच्या नावाचा फलक पाडल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार
कोपरगाव, दि. १० जून : कोपरगाव शहरातील महात्मा गांधी प्रदर्शन रस्त्यालगत असलेल्या आण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोरील महापुरुषांच्या नावाचा फलक अज्ञात व्यक्तीने जाणूनबुजून पाडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक-मालक असोसिएशन, कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
असोसिएशनच्या निवेदनानुसार, मंगळवार (दि. ९ जून) रोजी सदर फलक कोणीतरी मुद्दाम पाडला. हा फलक आण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक-मालक असोसिएशन, महाराष्ट्र (नोंदणी क्र. १९०/२०१८) यांच्या वतीने २०१८ पासून उभारण्यात आला असून, तो कोणत्याही नागरिकाच्या किंवा वाहतुकीच्या अडथळ्याचा विषय नव्हता.

असोसिएशनने या कृत्याचा निषेध व्यक्त करत, महापुरुषांच्या नावाचा अवमान झाल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच, या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

या निवेदनावर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, पाडण्यात आलेल्या फलकाची प्रतही पुरावा म्हणून जोडण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
स्थानिक स्तरावर या घटनेची चर्चा सुरू असून, पोलीस प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.कारवाई न झाल्यास पुढील निवेदन डीवायएसपी कार्यालयाला देण्यांत येईल असा इशारा असोसिएशनने दिला आहे.



