कोपरगावात योग वर्गाला पोलीस उपनिरीक्षकांची सदिच्छा भेट

कोपरगावात योग वर्गाला पोलीस उपनिरीक्षकांची सदिच्छा भेट; महिलांना सुरक्षिततेबाबत केले मार्गदर्शन
कोपरगाव, प्रतिनिधी : महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” म्हणजेच “सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट” या विचाराला न्याय देत कोपरगाव शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. सोनने यांनी स्थानिक योग वर्गाला सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी गेल्या २५ वर्षांपासून महिलांच्या आरोग्यासाठी सातत्याने सुरू असलेल्या योग उपक्रमाचे कौतुक केले. महिलांनी शारीरिक व मानसिक आरोग्याबरोबरच सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातही सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले
तसेच वाढत्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नये, ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
योग वर्गातील महिलांनी पोलीस उपनिरीक्षक सोनने यांच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत केले. महिलांच्या सुरक्षिततेसह जनजागृतीसाठी पोलीस प्रशासनाने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



