पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांची दमदार सुरुवात

कोपरगाव : पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांचा अॅक्शन मोड; विशेष नाकाबंदीत ३३ वाहनचालकांवर कारवाई
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी वाहतूक शिस्तीसह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अॅक्शन मोड स्वीकारला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, वाहनांची आवश्यक कागदपत्रे जवळ नसणे, क्रमांक फलकातील त्रुटी तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. नियमभंग करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

नवीन पोलीस निरीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरात वाहतूक शिस्तीवर विशेष भर दिला असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या विशेष नाकाबंदी मोहिमा आगामी काळात सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला असून, नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
शहरात सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी पोलिसांचे विशेष प्रयत्न सुरू असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.




