आंघोळीची बादली घेऊन थेट नगरपालिकेत

आंघोळीची बादली घेऊन थेट नगरपालिकेत
निवेदने देऊनही प्रश्न कायम; आंदोलनानंतर प्रशासनाला जाग!
कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील समतानगर परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गटार व सांडपाणी व्यवस्थेचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अब्दुल हफीज इस्माईल शेख यांनी गांधीगिरी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी (३० सप्टेंबर) शेख हे चक्क पाण्याची बादली घेऊन अंघोळ करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेत दाखल झाले. मात्र, मुख्याधिकारी अजित निकत यांनी त्यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा करत लेखी आश्वासन दिल्यानंतर शेख यांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले.
समतानगर परिसरातील गटारी, सांडपाणी व्यवस्था तसेच रस्त्यांच्या समस्या मागील १० ते १२ वर्षांपासून कायम असल्याचे शेख यांनी नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात नमूद केले होते. गटारीची व्यवस्था नसल्याने अनेक नागरिकांना घरातील सांडपाणी शोषखड्ड्यांमध्ये सोडावे लागत आहे. हे शोषखड्डे वारंवार भरत असल्याने नागरिकांना पुन्हा-पुन्हा नवीन खड्डे खोदावे लागत असून, त्यामुळे आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काही ठिकाणी सांडपाणी घरात साचण्याची परिस्थिती निर्माण होत असून, परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या समस्यांबाबत नागरिकांनी यापूर्वी अनेकदा नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदने देऊन तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने शेख यांनी २२ सप्टेंबर रोजी नगरपालिकेला निवेदन देत आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता.मागण्या मार्गी न लागल्यास नगरपरिषद कार्यालयाच्या दालनात दररोज दुपारी १२ वाजता अंघोळ करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा शेख यांनी दिला होता. प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्याने बुधवारी ते पाण्याची बादली घेऊन आंदोलनासाठी नगरपालिकेत दाखल झाले.
यावेळी मुख्याधिकारी अजित निकत यांनी शेख यांची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. समतानगरमधील सांडपाणी व गटारीच्या प्रश्नावर आवश्यक कार्यवाहीची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. हा विषय आगामी सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार असून, सभेच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच एका महिन्याच्या कालावधीत समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिले. या आश्वासनानंतर शेख यांनी प्रशासनाच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत आपले गांधीगिरी आंदोलन तूर्तास स्थगित केले.
,



