Breaking
ब्रेकिंग

अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन सुखरूप सुटका

0 1 1 9 0 6

‘ऑपरेशन मुस्कान’ला मोठे यश; अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन सुखरूप सुटका

मुख्य आरोपीसह आई व मावशीला अटक; आरोपीस ५ दिवसांची पोलीस कोठडी

कोपरगाव : अल्पवयीन मुलीला फूस लावून सोबत नेल्याच्या प्रकरणात कोपरगाव तालुका पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिची सुखरूप सुटका केली. या प्रकरणातील मुख्य आरोपीस मदत केल्याच्या आरोपावरून त्याची आई व मावशी अशा दोघींनाही पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी दि. ३० एप्रिल २०२६ रोजी रात्री घरातून निघून गेल्यानंतर तिच्या वडिलांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिस पथकाने तांत्रिक माहिती, उपलब्ध पुरावे व इतर बाबींच्या आधारे शोध घेतला. यावेळी अल्पवयीन मुलगी मयूर विठ्ठल पवार (वय २०, रा. कारवाडी फाटा, ता. कोपरगाव) याने फूस लावून पळवून नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पिंपळगाव वसवंत परिसरातून अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिची सुखरूप सुटका केली. मुलीला सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात आणण्यात आले. तिच्या जबाबावरून तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली असून, गुन्ह्यात भा.दं.वि./BNS कलम ६४(१), ८७ तसेच POCSO Act, 2012 मधील कलम ४, ८, १२ यांसह संबंधित कलमांची वाढ करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुख्य आरोपीला अटक; ५ दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणातील मुख्य आरोपी मयूर विठ्ठल पवार याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस कोठडीत आरोपीकडून गुन्ह्याबाबत अधिक माहिती मिळविण्यासह उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करण्यात येत आहे.

आई व मावशीचीही भूमिका तपासात समोर

तपासादरम्यान आरोपीची आई ललिता विठ्ठल पवार (वय ३८, रा. कारवाडी फाटा, ता. कोपरगाव) तसेच आरोपीची मावशी छाया पांडुरंग निकम (वय ४०, रा. वाकद-शिरुडे ता. निफाड, जि. नाशिक) यांनी आरोपीला मदत केल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीच्या मावशीने अल्पवयीन मुलीस आपल्या घरी सुमारे १५ दिवस आश्रय दिल्याचा, तर आरोपीच्या आईने आरोपीस लपून राहण्यास मदत केल्याचा आरोप आहे. तसेच तपासादरम्यान पीडित मुलीशी संपर्क साधून तिच्या वडिलांना पोलिसांत तक्रार देण्याची माहिती देण्यात आल्याचेही समोर आले. या आरोपांच्या आधारे दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अशा प्रकरणांमध्ये तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 9 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे