फ्लोरिडाच्या भक्ताकडून अठरा लाखांची चांदीची छत्री साईचरणी

फ्लोरिडाच्या भक्ताकडून अठरा लाखांची चांदीची छत्री साईचरणी
नाशिकच्या कारागिरांनी १० दिवसांच्या मेहनतीतून साकारली छत्री
प्रतिनिधी कोपरगाव
अमेरिकेतील फ्लोरिडा येथील मूळ भारतीय अनिवासी भक्त चंद्रशेखर कामभामेट्टू यांनी शिर्डीच्या साईबाबांना १८ लाख ८४ हजार ८६३ रुपये मूल्याचे सुवर्ण-रजत छत्र अर्पण केले आहे. मंगळवारी हे नवे छत्र साईबाबांच्या मूर्तीवर लावण्यात आले.
या छत्राच्या निर्मितीची जबाबदारी कोपरगावचे ‘विसपुते सराफ’ यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या पेढीचे संचालक यश विसपुते यांनी या कामासाठी नाशिकचे नामांकित सुवर्ण कारागीर इंदर सोनी यांची निवड केली होती.
तांत्रिक व कलात्मक तपशील
८.९३३ किलो वजनाची शुद्ध चांदी
२५० ग्रॅम शुद्ध सोन्याचा मुलामा
१० दिवस सलग मेहनत करून निर्मिती
सातासमुद्रापलीकडची अथांग श्रद्धा
आपल्या आयुष्यातील यश, समृद्धी आणि प्रगती ही केवळ साईबाबांच्याच कृपेमुळे असल्याची चंद्रशेखर कामभामेट्टू यांची गाढ श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून त्यांनी हे अमूल्य छत्र साईबाबांच्या चरणी समर्पित केले.



