Breaking
ब्रेकिंग

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कष्टांचा गौरव करणारा १५ ऑक्टोबर ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’

0 1 1 9 0 6

ऊन-वारा-पावसाची तमा नाही! वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कष्टांचा गौरव करणारा १५ ऑक्टोबर ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ म्हणून साजरा
ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता जनतेपर्यंत बातम्या पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कष्टांचा गौरव करण्याचा दिवस

पावसाळा असो वा कडाक्याची थंडी, पहाटेच्या शांत वातावरणात उठून वर्तमानपत्रांचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे आणि सायकलवरून किंवा पायी घरोघरी वर्तमानपत्रे पोहोचवायची, हा नित्यक्रम वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर हा सन्मानाचा दिवस म्हणून ओळखला जात आहे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ साजरा करण्याच्या उपक्रमामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या योगदानाकडे समाजाचे लक्ष वेधले जात आहे.


वृत्तपत्र विक्रेते हे समाजातील महत्त्वाचे घटक आहेत. पहाटेपासून आपल्या कामाला सुरुवात करून ते घराघरांत वर्तमानपत्रे पोहोचवतात. देश-विदेशातील घडामोडी, राजकीय घटना, सामाजिक प्रश्न, शैक्षणिक माहिती आणि स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेत त्यांची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, त्यांच्या कष्टांची आणि योगदानाची समाजाकडून अनेकदा पुरेशी दखल घेतली जात नाही.
डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासात संघर्ष, मेहनत आणि जिद्द यांना विशेष महत्त्व होते. बालपणी त्यांनी वृत्तपत्रे वाटप करून कुटुंबाला हातभार लावला होता. पुढे आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत मजल मारली. त्यांच्या या प्रेरणादायी जीवनप्रवासामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मेहनतीला विशेष महत्त्व प्राप्त होते.

१५ ऑक्टोबर हा दिवस वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी केवळ आनंदाचा नव्हे, तर त्यांच्या कष्टांची जाणीव करून देणारा दिवस आहे. या व्यवसायातील अनेक जण प्रतिकूल परिस्थितीतही आपले काम प्रामाणिकपणे करत असतात. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि त्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्या

वृत्तपत्र विक्रेत्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा मिळावी, यासाठी विविध मागण्या पुढे येत आहेत.

कल्याणकारी मंडळाची स्थापना : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करावे.

पेन्शन योजना : वयोवृद्ध वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्थिक आधार मिळण्यासाठी पेन्शन योजना लागू करावी.

एसटी महामंडळाचा पास : वृत्तपत्र विक्रेत्यांना प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पास उपलब्ध करून द्यावा

स्वतंत्र भवनासाठी जागा : प्रत्येक जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी भवन उभारण्याकरिता जागा उपलब्ध करून द्यावी.

अपघात विमा : शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी अपघात विमा योजना लागू करावी.

वृत्तपत्र विक्रेत्यांना सन्मानाची वागणूक मिळणे गरजेचे

वृत्तपत्र विक्रेते हा मेहनतीने आणि प्रामाणिकपणे काम करणारा घटक असूनही अनेकदा दुर्लक्षित राहतो.  तर काहीजण त्यांच्याशी आदराने वागतात. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांकडे पाहण्याची मानसिकता बदलून त्यांच्या कामाचा आदर केला पाहिजे.

डॉ. अब्दुल कलाम यांचा संघर्षमय प्रवास आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचे कष्ट यांची सांगड घालणारा हा दिवस त्यांच्या योगदानाची जाणीव करून देणारा आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांवर शासनाने सकारात्मक विचार करून त्यांना सामाजिक सुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि सन्मान मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, हीच या दिनानिमित्त अपेक्षा आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईज्योत न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 9 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे