गंभीर मारहाण व चाकू हल्ल्याच्या गुन्ह्यात १० महिन्यांपासून फरार आरोपी अटकेत

गंभीर मारहाण व चाकू हल्ल्याच्या गुन्ह्यात १० महिन्यांपासून फरार आरोपी अटकेत
कोपरगाव तालुका पोलिसांची कारवाई; सुरेगाव येथून आरोपीला घेतले ताब्यात
कोपरगाव : कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेगाव येथे १६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या गंभीर मारहाण व चाकू हल्ल्याच्या गुन्ह्यात सुमारे १० महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी गु.र.नं. २९७/२०२५ अन्वये भा.न्या.सं. कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी लक्ष्मण शरद पिंपळे, रा. सुरेगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. अटक चुकविण्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी ओळख लपवून राहत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

दरम्यान, १७ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी सुरेगाव परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने त्याला रात्री सुमारे १०.४५ वाजता अटक करण्यात आली.
नेमके काय घडले होते?
१६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुरेगाव येथील एका ठिकाणी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपींनी जखमी कपिल राजू पिंपळे वय 27 यास अडवून मारहाण केल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेत चाकूने वार झाल्याने जखमीला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
या गुन्ह्यातील अन्य आरोपी संदीप दादा काळे यास यापूर्वीच अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास सुरू
अटक आरोपी लक्ष्मण पिंपळे याच्याकडून गुन्ह्यातील त्याची नेमकी भूमिका, गुन्ह्यानंतरच्या हालचाली तसेच इतर फरार आरोपींच्या ठावठिकाणाबाबत तपास सुरू आहे. आरोपीने गुन्ह्यावेळी परिधान केलेले कपडे जप्त करणे, फरारी काळातील हालचाली व संपर्कांची पडताळणी करणे तसेच इतर आरोपींचा शोध घेणे या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मम्मका, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोनि/संभाजी गायकवाड, सपोनि धरमसिंग सुंदरडे, पो.कॉ. अमोल घनवट व पो.कॉ. अनिल फाळके यांनी केली.
गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.



